सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘गणा धाव रे’

आशयघन कथा, सांस्कृतिक भान आणि भावनांचा हळुवार स्पर्श यांचा प्रभावी संगम घडवणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावविश्वाला स्पर्श करणारा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत. त्यांचा ‘गणा धाव रे’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तीभाव यांच्या गाभ्याशी जोडलेली एक भावस्पर्शी कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण टीमने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह अभिनेत्री प्रणाली घोगरे, अभिनेते आशुतोष गायकवाड व ओंकार पाटील उपस्थित होते.

कोकणाच्या निसर्गरम्य, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’ हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेचा प्रवास मांडणारा आहे. कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या या कथेमध्ये भक्त आणि दैवत यांच्यातील अदृश्य, पण भावनिक नात्याचा सूक्ष्म शोध घेण्यात आला आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ही फक्त एक कथा नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाशी जोडलेला एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. अनेकदा आपण कथा निवडतो, पण या वेळी या कथेनेच मला निवडले. या कथेमधील अध्यात्मिक आणि मानवी भावनांचा प्रवाह प्रेक्षकांच्या मनापर्यंत निश्चित पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *