गारंबीचा बापू आता चित्रपट रूपात

कोकणची माती अशी की, ती फक्त भात पिकवत नाही, तर माणसंही घडवते. आंबा-फणसाच्या दाट राईतून, माडा-पोफळींच्या सावलीतून आणि खाडीच्या खारट वाऱ्यातून एक अवखळ, बेभान आणि तितकंच निखळ आयुष्य इथं फुलतं. हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी या समुद्रकिनाऱ्यांपासून वर दापोलीपर्यंत पसरलेल्या याच त्रिकोणी प्रदेशात वसलंय एक गाव म्हणजे गारंबी. याच गारंबीत जन्माला येते एक गोष्ट, जी काळाच्या पडद्याआड जात नाही, उलट पिढ्यानपिढ्या तितकीच ताजी राहते ती म्हणजे “गारंबीचा बापू”. गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली निर्मिती केलेला हा चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी नव्या तंत्रज्ञानाची जोड देत नव्या रूपात साकारला आहे.

घाटावर जशी पाटलाची सत्ता चालते, तशी कोकणात खोताची चालते. पण सत्ता आली की तिच्यासोबत माज येतोच, आणि माजातून जन्म घेते हुकूमशाही. गारंबीतला अण्णा खोत हा असाच एक निरंकुश सत्ताधीश. त्याच्या जुलमी वर्तनाला, त्याच्या दहशतीला जो एकटा आव्हान देतो, तो म्हणजे बापू. कुणाची भीड न बाळगणारा, स्वतःच्याच तालात जगणारा, अचाट आणि बेफाट वागणारा हा तरुण गारंबीत “अफाट बापू” म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच बंडखोर आयुष्यात येणारी राधा – श्री. ना. पेंडसे यांच्या काळाच्या पुढे जाणाऱ्या लेखणीतून साकारलेली, त्या नावाला पुरेपूर न्याय देणारी व्यक्तिरेखा आणि अण्णा खोतच्या सावटाखाली दबलेलं गारंबी गाव, हीच खरी या कथेची ओळख.

कोकणच्या मातीतील याच सिद्धहस्त कथेला श्री. ना. पेंडसे यांच्या शब्दांतून शशी पेंडसे यांनी पुन्हा पडद्यावर उतरवलंय. प्रसाद ओक बापूच्या भूमिकेत आपल्या सहज अभिनयातून त्या कलंदर वृत्तीला जिवंत करणार आहेत, तर देविका दफ्तरदार राधाच्या भूमिकेत तितक्याच ताकदीने उभ्या राहतील. यतिन कार्येकर अण्णाच्या क्रूर सत्तेला पडद्यावर आणतील, तर जयवंत वाडकर (मुसा), शशी पेंडसे (विठोबा) आणि माधवी सोमण (मावशी) या व्यक्तिरेखांमधून गारंबीचं इरसाल विश्व अधिक ठसठशीत होईल. जयसिंग यांच्या छायांकनातून कोकणचं सौंदर्य आणि रांगडेपण दोन्ही टिपलं जाईल.

आणि या साऱ्याला जोड मिळेल ती वैशाली सामंत यांच्या संगीताची. अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, उर्मिला धनगर आणि खुद्द वैशाली सामंत यांच्या आवाजातून कोकणची लोकधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल. एकाधिकारशाहीविरुद्धच्या संघर्षाची आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडणारी ही कथा नव्या एआय तंत्रज्ञानाच्या साथीने प्रेक्षकांसमोर येणार आहे. कोकणच्या मातीतील हा अनोखा बाज पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आणि ‘गारंबीचा बापू’च्या या नव्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकही आता उत्सुक आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *