बालमनातील निरागस कुतूहल

मुंबई : गुलशन देवैया आणि रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘लिटिल थॉमस’ या चित्रपटातील दुसरे गाणे ‘Adults Wrong Hai’ प्रदर्शित झाले आहे. जुंगली म्युझिक (टाइम्स म्युझिकचा विभाग)च्या माध्यमातून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, सात वर्षांच्या मुलाच्या निरागस कुतूहलाची आणि त्याच्या प्रश्नांकडे पाहण्याच्या गमतीदार दृष्टिकोनाची झलक या गाण्यातून पाहायला मिळते.

शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अनुपम बर्मन यांनी आवाज दिला असून, रंजन सिंह आणि इयागो यांनी गीतलेखन केले आहे. लहान थॉमसला पडणाऱ्या असंख्य प्रश्नांपैकी ‘बाळं नेमकी येतात कुठून?’ हा प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्याची त्याची निरागस धडपड या गाण्यात विनोदी आणि हळुवार पद्धतीने मांडण्यात आली आहे. मोठ्यांकडून मिळणारी अस्पष्ट उत्तरे आणि त्यांचे गुंतागुंतीचे तर्क समजून घेण्याचा प्रयत्न करताना थॉमस स्वतःच निष्कर्ष काढतो की, ‘मोठी माणसं चुकीची आहेत!’ बालमनातील हा निरागस विश्वास गाण्याला विनोदी तसेच भावनिक स्पर्श देतो.

मुलांच्या उत्साही सामूहिक गायनासह ध्वनिक वाद्यसंगीताची साथ असल्याने ‘Adults Wrong Hai’ हे गाणे चैतन्यपूर्ण आणि श्रवणीय बनले आहे. सातव्या वर्षी पडणारे निरागस प्रश्न, मोठ्यांच्या उत्तरांबद्दल निर्माण होणारी शंका आणि स्वतःच्या तर्कावर असलेला विश्वास यांचे सुंदर चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे.

‘लिटिल थॉमस’चे लेखन आणि दिग्दर्शन कौशल ओझा यांनी केले आहे. ल्यूमिनोसो पिक्चर्स, सिविक स्टुडिओज, गुड बॅड फिल्म्स आणि फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनुष्का शाह, राजनिकांत ओझा, चारु ओझा, रंजन सिंह आणि अनुराग कश्यप हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘Adults Wrong Hai’ हे गाणे सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले असून, गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ टाइम्स म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. ‘लिटिल थॉमस’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *