एकाच भूमिकेसाठी शिकल्या अनेक भाषा – पायल जाधव

‘तारिणी’ मालिकेत आता एका नव्या आणि रहस्यमय पात्राची एन्ट्री झाली आहे. हरप्रीत कौर चढ्ढा ही मुलगी नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. हरप्रीत ही दुसरी तिसरी कोणी नसून ‘रेवा’ आहे, जी केदारची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. एका विशेष मिशनसाठी ती आपली ओळख बदलून ‘टीम तारिणी’ मध्ये सामील झाली आहे. अभिनेत्री पायल जाधव या मालिकेत हरप्रीत ऊर्फ रेवाची भूमिका साकारताना दिसत असून, तिच्या येण्याने मालिकेच्या कथानकाला एक नवी आणि रोमांचक कलाटणी मिळाली आहे. रेवा गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेचे काम करत होती आणि आता ती एका अंडरकव्हर कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. केदारने तिला राहण्यासाठी आपल्या बेलसरे येथील घरी जागा दिली असून, तिथूनच या दोघांच्या मैत्रीचा नवा प्रवास सुरू होणार आहे. रेवा या भूमिकेबद्दल पायल जाधव हिने आपले मनोगत सांगितले.

माझ्या भूमिकेचं नाव हरप्रीत कौर चढ्ढा असले तरी माझे खरे नाव रेवा आहे. या भूमिकेसाठी मला खूप तयारी करावी लागली. या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्यासोबत काम करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. माझी सह-कलाकार शिवानी सोनार हिला मी आधीपासून ओळखते. ती उत्तम काम करते.

या भूमिकेत मला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची संधी मिळत आहे. जे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक पण मजेशीर आहे. मालिकेत मला विविध भाषा बोलणाऱ्या पात्रांशी संवाद साधायचा आहे. माझ्यासाठी या सर्वच भाषा नवीन आणि कठीण आहेत, त्यामुळे त्यांचा लहेजा अचूक पकडण्याचा मी प्रयत्न करत आहे. एखादी भाषा इतक्या कमी वेळात आत्मसात करून ती सफाईदारपणे बोलणं हे एक मोठं आव्हान आहे. सुदैवाने, सेटवर काही बहुभाषिक लोक आहेत, ज्यांची आम्हाला खूप मदत होत आहे.

टीमने मला अवघ्या दोन दिवसांत आपलेसे केले. ‘टीम तारिणी’मधील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांसाठी नक्कीच कुतूहलाचा ठरणार आहे. रेवाचे मिशन नक्की काय आहे आणि ती केदारच्या आयुष्यातील गुपित कशी उघड करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”

पायल जाधवची ‘तारिणी’ ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता झी मराठीवर दाखवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *