मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेला अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडला गेला आहे. रजत बेदी हा आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचा पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचा नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

रजत बेदी प्रस्तुत जे.एस.डी. स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.
मॉडेलिंगपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजत बेदी याने १९९४ मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकली. ‘२००१ : दो हजार एक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ‘कोई मिल गया’मधील भूमिकेने त्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. ‘जोडी नंबर १’, ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’, ‘पार्टनर’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांत त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतही त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवुड’ या सिरीजच्या माध्यमातून रजत बेदी याने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले असून, त्याच्या या नव्या इनिंगची विशेष चर्चा झाली.

अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही रजत बेदी याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे ‘बंधू’चे प्रस्तुतकर्ते म्हणून त्याचा सहभाग हा केवळ व्यावसायिक भागीदारी नसून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या प्रदीर्घ प्रवासातून मराठी सिनेमाला मिळणारा एक नवा हातभार मानला जातोय.

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल रजत बेदी म्हणाला, ‘बेदी कुटुंबासाठी भारतीय चित्रपटसृष्टी ही केवळ एक इंडस्ट्री नाही, तर आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून मिळालेला हा वारसा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी चित्रपटातून या प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मराठी सिनेमा त्याच्या आशयासाठी आणि दर्जेदार कथांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षक माझ्या या नव्या भूमिकेचं आणि या चित्रपटाचं नक्कीच प्रेमाने स्वागत करतील, अशी आशा आहे.’

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
