सतीश पुळेकर, इला भाटे एकत्र

“प्रेम कसे करायचे ते अनेक लोक शिकवतात, मात्र ते प्रेम कसे विसरायचे, हे कोणी शिकवत नाही”. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते. प्रेमाला कोणत्या वयाचे बंधन नसते. आवडणारी व्यक्ती आयुष्यातून अचानकपणे निघून जाऊन, अनेक वर्षांनी ती व्यक्ती आपल्या समोर आली तर पुढे काय होईल? याची रंजक गोष्ट “तुला पाहता” या चित्रपटातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे.

‘तुला पाहता’ हा चित्रपट ७०च्या दशकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रपटातील १९७०चे दशक हे त्या काळातील वेशभूषा, एकूणच वातावरण आणि संगीताच्या बाबतीत एक वेगळेपण दर्शवते; जे प्रेक्षकांना थेट १९७० च्या दशकात घेऊन जाते. चित्रपटातील आजचा काळ हा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘पिढ्यांमधील अंतर’ (Generation Gap) यांसारख्या समकालीन सामाजिक मुद्द्यांना हाताळतो.

प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेले यांच्यामध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, नचिकेत लेले, मानसी पाटील, यांच्यासह निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून १० जुलैला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *