डिजीटलच्या युगात मराठी प्रेक्षकांनाही डिजीटल मनोरंजनाची सवय लागलेली असतानाच सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार मराठी काँटेंट उपलब्ध होत नाही. त्यावर रामबाण उपाय म्हणून एक नवे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ ‘स्टेज’ मराठीत दिमाखात दाखल झाले आहे. अंधेरीतील वेदा कुणबा थिएटरमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या सोहळ्याला ‘स्टेज’चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल, स्टेज ओटीटी मराठी कन्टेन्ट हेड राजेश पाठक तसेच मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कलाकारांच्या मांदियाळीत अनंत महादेवन, चिन्मय मांडलेकर, क्षितीज दाते, श्रेया बुगडे, उर्मिला जगताप, पुष्कर जोग, निशा परुळेकर यांचा समावेश होता. यावेळी ‘स्टेज’ मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या मराठी कलाकृतींची घोषणाही करण्यात आली.

‘स्टेज’ हे केवळ एक ओटीटी प्लॅटफॉर्म नसून, ही एक क्रांती असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. २०१९ मध्ये स्थापन झालेले ‘स्टेज’ हे भारतातील पहिले बोलीभाषा आधारित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि गुजराती भाषेत यशस्वी क्रांती केल्यानंतर, ‘स्टेज’ आता कोट्यावधी मराठी प्रेक्षकांना त्यांच्या मातीतील, त्यांच्या बोलीभाषेतील दर्जेदार आणि कौटुंबिक आशय देण्यासाठी सज्ज झाले आहे. १ मेपासून ‘स्टेज’ सुरू झाले असून, लवकरात लवकर मराठी रसिकांनी याचे सबस्क्रीप्शन घ्यायला हवे असे आवाहनही प्रवीण सिंघल यांनी केले.

‘इलू इलू १९९८’, ‘सखे गं साजणी’, ‘डेटिंग सेटिंग’, ‘प्लस मायनस’, ‘प्रेमाचा तमाशा’, ‘पहिलं प्रेम’, ‘माझी वाली लव्हस्टोरी’ या ‘स्टेज’ मराठीवरील कलाकृती रसिकांचे लक्ष वेधणार आहेत. यापैकी ‘डेटिंग सेटिंग’ या वेब सीरिजसोबतच ‘इलू इलू १९९८’ व ‘सखे गं साजणी’ या चित्रपटांची झलकही दाखवण्यात आली. ‘डेटिंग सेटिंग’मध्ये क्षितिज दाते आणि श्रेया बुगडे मुख्य भूमिकेत आहेत.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
