बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध

बाप लेकीचं नातं सगळ्यांपेक्षा वेगळं आणि खास असतं. लेकीच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहणारा बाबा आणि बाबांच्या प्रेमात आपलं संपूर्ण विश्व पाहणारी लेक अशाच एका नात्यातला प्रेम, माया आणि भावनांचा सुंदर कोलाज आता ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले यांच्या अभिनयातून साकारलेलं प्रभाकर आणि लक्ष्मीचं नातं ‘दशमी’ चित्रपटाच्या कथेला भावनिक खोली देणार आहे. बाप-लेकीच्या या हळव्या नात्याची कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्शून जाणारी आहे. ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

याविषयी मकरंद अनासपुरे सांगतात, ‘प्रभाकर’ या भूमिकेतून एका वडिलांचं मुलीवरील प्रेम आणि तिच्यासाठीची धडपड अनुभवता आली. मुलीसमोर खंबीर राहूनही आतून तुटणारा प्रभाकर साकारताना हा प्रवास मनाला भिडणारा होता.’ दुसरीकडे, गौरी इंगवले सांगते, ‘लक्ष्मी आणि तिच्या वडिलांचं नातं खूप साधं पण मनाला भिडणारं आहे. लक्ष्मीच्या प्रत्येक स्वप्नामागे तिच्या वडिलांचे कष्ट आहेत, याची तिला जाणीव आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेतून वडिलांबद्दलचं प्रेम, त्यांच्याशी असलेली भावनिक जवळीक आणि आयुष्यात आलेल्या संकटानंतर बदललेलं तिचं विश्व साकारताना खूप भावनिक अनुभव आला.

‘दशमी’मधील प्रभाकर आणि लक्ष्मीचा प्रवास हा केवळ एका वडील-मुलीची कथा नसून, मुलीच्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या प्रत्येक वडिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले यांच्या अभिनयातून हे नातं पडद्यावर किती जिवंत होतं, याची उत्सुकता आता नक्कीच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *