‘दीपज्योती’ या मालिकेत अभिनेत्री मानसी सुभाष ‘प्रीती’ ही व्यक्तिरेखा साकारतेय. या मालिकेत ती ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण आणि अभिजीतची लाडकी बहीण आहे. या भूमिकेबद्दल आणि तिच्या अभिनयप्रवासाबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या मालिकेतील तुझ्या भूमिकेबद्दल सांग.
- यात मी प्रीती ही भूमिका साकारतेय. ती ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण आणि अभिजीतची लहान बहीण आहे. प्रीती खूप प्रोटेक्टिव्ह आणि पजेसिव्ह स्वभावाची आहे, विशेषतः तिच्या भावाबाबत. तिचे ठाम मत आहे की तिच्या दादाला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याला राग येईल असे काहीही घडू नये. तिचा आणि तिच्या दादाचा खूप सुंदर बॉण्ड आहे. मालिकेच्या सुरुवातीला ती रोखठोक, प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी मुलगी म्हणून दिसते. पण जसजशी मालिका पुढे जाते, तसतशी तिच्या लाडक्या भावाचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात होतो. या परिस्थितीच्या दबावामुळे ती हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते.

या भूमिकेसाठी बोलावले त्यावेळी तुला काय वाटले?
- मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. तेव्हा मला खूप आनंद झाला. मुळात मी प्रीतीच्या भूमिकेसाठी आले होते, पण ज्योतीच्या कॅरेक्टरसाठीही मी अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. नंतर मला कळवण्यात आले की माझी निवड प्रीतीच्या भूमिकेसाठी झाली आहे, जी ज्योतीची मोठी बहीण आहे. सुरुवातीला सकारात्मक असलेली मुलगी नंतर खलनायिकेकडे झुकते हा प्रवास साकारताना मला खूप मजा येईल, असे मला वाटते.
खलनायिका साकारताना भीती नाही वाटली?
- सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, पण नंतर लक्षात आले की ही व्यक्तिरेखा परिस्थितीनुसार बदलणारी आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. तयारी म्हणून मी खूप लहानसहान गोष्टींवर काम करत आहे. प्रेक्षकांना मी खलनायिका वाटली पाहिजे, यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे. उदा. तिला कोणत्या गोष्टींवर राग येतो, ती कशी प्रतिक्रिया देते, अचानक वाईट वाटल्यावर ती कशी वागते आणि रागानंतर कशी शांत होते यावर मी सातत्याने सराव करत आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेची बॅकस्टोरी समजून घेते आणि तिच्या अॅक्शन-रिअॅक्शनचा सखोल विचार करते.
खलनायिका साकारण्याचा आधी काही अनुभव वगैरे…
- नाही. या आधी मी खलनायिकेची भूमिका साकारलेली नाही. प्रीतीच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमुळे ती खलनायिका बनते. हा बदल साकारणे माझ्यासाठी खूप रोचक आहे. मालिकेत तिचा जिवाभावाचा भाऊ आणि तिचा होणारा नवरा सुजय एका क्षणात तिच्या आयुष्यातून निघून जातात. या मोठ्या धक्क्यामुळे ती खलनायिकेसारखी वागू लागते. त्यामुळे ती परिपक्व खलनायिका म्हणून नव्हे, तर परिस्थितीमुळे बदललेली व्यक्ती म्हणून प्रेक्षकांसमोर येईल, असे मला वाटते.
प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
- प्रोमो पाहून अनेक लोकांनी मला फोन केले. ज्यांचा बऱ्याच वर्षांपासून संपर्क नव्हता, अशा लोकांनीही माझे अभिनंदन केले. माझी निवड झाल्याचा त्यांना खूप आनंद झाला. सहकलाकार आणि टीम खूप छान आहे. मालिकेतील ज्योती, कीर्ती, अभिजीत आणि मी आम्ही सगळे खूप वेळ एकत्र घालवतो आणि खूप मजा करतो. जेवतानाही आम्ही एकत्र असतो. सेटवरील सर्वजण समजून घेणारे आणि सहकार्य करणारे आहेत.

सेटवर तुम्ही तिघी आहात. कसं जमतंय?
- आमची तिघींची मस्त गट्टी जमली आहे. सेटवर आम्हा तिघींमधील कोणी एक जरी नसली, तरी खूप रिकामेपणा जाणवतो. एकदा माझा आणि ज्योतीचा सीन होता, पण कीर्ती शूटला नव्हतं तेव्हा आम्हाला खूप वेगळं वाटलं. जणू आमच्यातील एखादा भागच हरवला आहे, असा अनुभव आला. आमची इतकी घट्ट मैत्री झाली आहे की, आम्हा तिघींमधील कोणी एक नसले तर सेटवर सगळे तिची चौकशी करतात.
अभिनयाची आवड आधीपासून होती का?
- हो. अभिनयाची आवड होतीच. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये मी नाटकांमध्ये भाग घेत होते. कॉलेजच्या वार्षिक महोत्सवातही मी सक्रियपणे सहभागी होत असे. मला नृत्याचीही खूप आवड आहे. घरी सगळे मला “हिरोईन” म्हणून हाक मारायचे. शेवटी ते खरेही झाले.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
