नीरू शर्मा यांच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय यश

मनोरंजन पत्रकारितेत दोन दशकांहून अधिक काळ कार्य केल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नीरू शर्मा यांच्या ‘बांद्रा बॉय’ या लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. २१ मिनिटांच्या या हिंदी थ्रिलर चित्रपटाची फ्रेम्स ऑफ न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपांत्य फेरीसाठी (Semifinalist) निवड झाली असून न्यूयॉर्क इंटरनॅशनल वूमन फेस्टिव्हलमध्ये त्याला Award Winner म्हणून गौरविण्यात आले आहे.

दिग्दर्शक म्हणून नीरू शर्मा यांच्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेली ही दुहेरी आंतरराष्ट्रीय मान्यता विशेष महत्त्वाची मानली जात आहे. बांद्रा बॉय हा चित्रपट माध्यमांची भूमिका, लोकधारणा आणि सत्य यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करतो. एखाद्या व्यक्तीबाबत सत्य समोर येण्यापूर्वीच माध्यमे, सामाजिक पूर्वग्रह आणि सार्वजनिक मतमतांतरे त्याची प्रतिमा कशी घडवतात, याचा शोध चित्रपट घेतो.

बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्राचे अनेक वर्षे वार्तांकन केल्यानंतर नीरू शर्मा यांनी चित्रपटनिर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पत्रकार म्हणून मिळालेल्या अनुभवांमुळेच या चित्रपटाची कथा आकाराला आल्याचे मानले जाते. या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना नीरू शर्मा म्हणाल्या, “दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे ही अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. ‘बांद्रा बॉय’ ही कथा माध्यमविश्व, मनोरंजन उद्योग आणि लोकधारणेचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यानंतर तयार झाली आहे. या सन्मानामुळे मला पुढेही आशयपूर्ण आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या कथा सांगण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

चित्रपट निर्मितीत येण्यापूर्वी नीरू शर्मा यांनी दिग्दर्शक सुभाष घई यांनी स्थापन केलेल्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल येथे दिग्दर्शनाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. पत्रकारितेतून चित्रपटनिर्मितीकडे झालेला त्यांचा प्रवास सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.

चित्रपटात अहवान कुमार मुख्य भूमिकेत असून, प्रसिद्ध गुजराती आणि मराठी अभिनेते धर्मेंद्र गोहिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लोचन बारसगडे, यश पेडणेकर, शाम थोंबरे, पवन तिवारी, ऐश्वर्या मनोहर, हिमांशी मांडालिया आणि नंदिनी शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. राजीव पराशर निर्मित या चित्रपटाचे संपादन मुबारकाँ, सडक २ आणि क्रॅक यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे संदीप कुरुप यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन आयुष शाह यांनी केले असून पार्श्वसंगीत कौशल महावीर यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *