सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट!

स्त्री म्हणजे केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारी किंवा तडजोड करणारी व्यक्ती नाही, तर वेळ आली तर परिस्थितीविरोधात उभी राहून स्वतःसाठी निर्णय घेणारी स्त्रीही आहे. स्त्रीच्या याच बेधडक रूपाची झलक दाखवणाऱ्या ‘बंडखोर’ या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टिझरमध्ये या सहा ‘बंडखोर’ स्त्रिया एकत्र आलेल्या दिसतात. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्या कशाच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत आणि त्यांची ही बंडखोरी नेमकी कशासाठी आहे, याची उत्सुकता टिझरनंतर अधिकच वाढली आहे. परिस्थितीपुढे मान झुकवण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी आवाज उठवणाऱ्या या सहा जणींची गोष्ट नेमकी कोणत्या वळणावर जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. नावातच ‘बंडखोर’ असलेल्या या सहा जणींची बंडखोरी नेमकी कशासाठी? स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या निर्णयांसाठी की आयुष्याने त्यांच्यावर लादलेल्या चौकटी मोडण्यासाठी? हे पाहाणं आता रंजक ठरणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “‘बंडखोर’ हा फक्त महिलांसाठीचा चित्रपट नाही. या सहा स्त्रिया ज्या परिस्थितीतून जातात, त्यात अनेकांना आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांचं प्रतिबिंब दिसेल. प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक गोष्ट असते, तिचे प्रश्न असतात आणि त्यांना सामोरं जाण्याची तिची स्वतःची पद्धत असते. ‘बंडखोर’मधल्या या सहा जणी परिस्थितीची बळी होऊन बसणाऱ्या नाहीत, तर तिच्याशी दोन हात करणाऱ्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक पुरुषानेही आपल्या आई, बहीण, बायको, मुलगी आणि मैत्रिणीसोबत आवर्जून पाहावा, असं मला वाटतं.” या चित्रपटाचे संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *