२०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहुना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे आजही “देऊळ बंद” आवर्जून बघितला जातो. “देऊळ बंद”चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी “देऊळ बंद २”ची घोषणा केली होती. या सिनेमाचे डिजिटल पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि “देऊळ बंद २” हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.
“आता परीक्षा देवाची” असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तसेच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे गुलदस्त्यात आहे. २१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या “देऊळ बंद २”चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
