‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिषेक बच्चनसाठी ‘राजा शिवाजी’ हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच मराठी चित्रपट असून, हा त्यांच्या सिनेमाच्या प्रवासातील एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. या चित्रपटात अभिषेक बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या दमदार ‘फर्स्ट लुक टीझर’मध्ये अभिषेक बच्चन एका पूर्णपणे वेगळ्या आणि प्रभावी अवतारात दिसून येतो. योद्ध्याचा साज चढवलेला पेहराव, रणांगणावरची त्यांची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाची झलक दाखवणारा भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना भारावून टाकतो.

आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल अभिषेक बच्चन म्हणाला, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेश विलासराव देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी रितेशला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्यावेळी मी अजय देवगण यांच्यासोबत शूटिंग करत होतो आणि रितेश आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.” असे तो म्हणाला.
तो पुढे म्हणाला, “एकदा रितेश देशमुखच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न माझ्यासमोर मांडले होते. हे स्वप्न त्याने अनेक वर्षे जपले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली,” असेही त्याने नमूद केले.
अभिषेक बच्चन याने रितेश देशमुख याच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत म्हटले, “रितेशने कदाचित आजवरचा सर्वात महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट साकारला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याची क्षमता किती आहे, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तो असे काहीतरी निर्माण करणार आहे, जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाचा भाग होता आल्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे आणि मला वाटते की हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरेल,” असे त्याने सांगितले.
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश देशमुख यांचा समावेश आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर भव्यतेने आणि भावनिकतेने उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेअनुभव ठरणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
