‘इंद्रजाल’ने वाढवली उत्सुकता…

रहस्य, थरार, पौराणिक कथा आणि गुप्त खजिन्याचा शोध याचा एक अनोखा संगम असलेला ‘इंद्रजाल’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेला हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांमधील निळावंतीशी संबंधित गूढ रहस्य आणि जंगलातील रोमांचक साहसावर आधालेला सिनेमॅटिक असा हा चित्रपट प्रत्येकाला खिळवून ठेवणारा आहे. नुकतीच ‘इंद्रजाल’ या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि फर्स्ट लुक समोर आलं असून ते सिने-रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवणारं आहे.

‘इंद्रजाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘ढ लेकाचा’, ‘रेष्टीभ’ आणि ‘कुलस्वामिनी’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. जमिनीशी जोडलेले, भावपूर्ण आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कथा मांडण्यासाठी ओळखले जाणारे हे दिग्दर्शक ‘इंद्रजाल’मार्फत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, किरण माने, कल्पना सारंग, नामदेव मुरकुटे यांसोबत दर्शना रसाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, संजना देशमुख, कल्पेश जगताप, लक्ष्मी विभुते आणि योगेश दांगट यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक जागेश्वर ढोबळे म्हणाले, या चित्रपटाद्वारे मी थरारनाट्य-रहस्यासोबत ओघवती कथाकथन शैली यांचा मेळ घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. माझ्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि या चित्रपटासाठी आपले सर्वस्व पणाला लावून काम केल्याबद्दल मी निर्मात्यांचा आणि माझ्या संपूर्ण टीमचा अत्यंत ऋणी आहे.

प्रमुख अभिनेता महेश निकम म्हणाला, इंद्रजालसारख्या भव्य हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी एक स्वप्न असू शकते. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना, भूमिकेशी समरस होताना मला मोठे आव्हान असायचे. म्हणूनच तिथला प्रत्येक दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आता 24 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यावर कधी एकदा प्रेक्षक इंद्रजालच्या जादूचा रोमांचक अनुभव घेतील याची मी आतुरतेने वाट पाहतोय.

या चित्रपटाचे छायांकन आकाश सेठी यांचे आहे, तर लेखन राज्य पुरस्कार विजेते लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. संगीत गौरव चाटी यांचे असून, गीतलेखन योगेश दांगट यांचे आहे. पार्श्वसंगीत उदय साळवी यांचे असून, वेशभूषा जान्हवी शिंदे यांनी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *