पुन्हा “राधिका सुभेदार” जगतेय

‘सनई चौघडे’ मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. जय आणि शर्वरी यांच्या संघर्षात आता एका अशा पात्राची एन्ट्री होत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांची लाडकी ‘राधिका सुभेदार’ म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते मालिकेत एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. पुन्हा एकदा ‘राधिका सुभेदार’ ही व्यक्तिरेखा जगताना मला जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखे वाटले.

या अनुभवाबद्दल सांगताना अनिता दाते म्हणते, ‘सनई चौघडे’च्या सेटवर येऊन मला खूप आनंद होत आहे. हा आनंद द्विगुणित झाला आहे कारण मला पुन्हा एकदा ‘राधिका सुभेदार’ भेटली आहे. ‘सनई चौघडे’मध्ये राधिका सुभेदारची एन्ट्री होणार आहे. याच भूमिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. २०१६ ते २०२१ अशी साडेचार वर्ष मी या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. आज पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना मला खूप अभिमान वाटतोय.

जेव्हा राधिका सुभेदार जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये येईल, तेव्हा जय आणि शर्वरीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. जयच्या ऑफिसमध्ये कोणत्याही स्त्रीला जागा नाही किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तिची निवड होणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण तिथे राधिका येईल आणि आपली जादू दाखवेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शर्वरीला पुन्हा कंपनीत आणण्यासाठी ती प्रयत्न करेल. झी मराठीसोबत माझं नातं खूप जुनं आणि प्रेमाचं आहे.

झी मराठीने मला नेहमीच खूप चांगल्या भूमिका दिल्या आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. एक अभिनेत्री म्हणून मला ‘राधिका’ ही ओळख याच मालिकेमुळे मिळाली. राधिका सुभेदार या भूमिकेने मला केवळ प्रसिद्धीच दिली नाही, तर माझं व्यक्तिमत्वही बदललं. आज त्याच आत्मविश्वासाने मी ‘सनई चौघडे’मध्ये येत आहे.

राधिका सुभेदारने केवळ माझंच आयुष्य बदललं नाही, तर महाराष्ट्रातील अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. अनेक महिलांनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. जेव्हा त्या मला भेटतात, तेव्हा त्या आवर्जून सांगतात की हा राधिका सुभेदारचा चमत्कार आहे. हे यश केवळ माझं नसून झी मराठीची संपूर्ण टीम आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. म्हणूनच इतकी वर्ष ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकली. राधिका ही एक अत्यंत सकारात्मक आणि दुसऱ्यांना मदत करणारी व्यक्तिरेखा आहे. अशी भूमिका मला पुन्हा पुन्हा साकारायला मिळाली तर मला नक्की आवडेल.

झी मराठीच्या कार्यक्रमांमध्ये स्त्री पात्रांना नेहमीच सन्मानाने आणि चांगल्या पद्धतीने मांडलं जातं. हे एक कुटुंब आहे आणि त्याचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. ‘सनई चौघडे’ मालिकेचे निर्माते राजू सावंत सर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. त्यांनी याआधीही दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीला अनेक उत्तम मालिका दिल्या आहेत. सनईची टीम खूप छान आहे आणि ते पडद्यावर नक्कीच दिसून येत. राधिकाच्या येण्याने मालिकेत एक मनोरंजक वळण येईल आणि कथा एका वेगळ्या दिशेला जाईल याची मला खात्री आहे. ‘सनई चौघडे’ मालिका दररोज रात्री ८ वाजता झी मराठीवर दाखवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *