कुटुंबातील नात्यांचा प्रवास

मराठी झी-5 ने ‘अगं आई अहो आई’ या आपल्या आगामी ओरिजिनल वेब मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मनाला भिडणारी कौटुंबिक मालिका आहे. वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही वेबमालिका एक मुली, तिची आई आणि तिची सासू यांच्यातील दुर्मिळ आणि सुंदर नात्याचा प्रवास दाखवणार आहे. ही वेबमालिका २४ जुलैपासून मराठी झी-5 वर सुरू होणार आहे.

अगं आई अहो आई ही नातेसंबंध, स्वीकार आणि मानवी जिव्हाळ्याची ताकद साजरी करणारी हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका आहे. पुणे आणि कोल्हापूर या दोन भिन्न विश्वांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका नवविवाहित तरुणीची आहे, जी नव्या कुटुंबात स्वतःचं स्थान शोधताना बदलणारे नातेसंबंध आणि भावनिक टप्प्यांचा अनुभव घेते. लग्नानंतर प्रत्येक मुलीसमोर एक न बोलला जाणारा प्रश्न उभा राहतो… आईशी असलेलं नातं जपत नव्या आयुष्यातील दुसऱ्या आईला स्वीकारण्याचा. मात्र ही मालिका या विषयाकडे एक ताज्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. स्पर्धा, अपेक्षा किंवा दोन नात्यांमध्ये निवड करण्याऐवजी ही मालिका अशा जगाची ओळख करून देते, जिथे एका स्त्रीला आई आणि सासू यांच्यात निवड करावी लागत नाही.

नायिका पुण्यातील तिचं परिचीत आयुष्य मागे सोडून ती कोल्हापूरमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, अपेक्षा आणि वातावरणाशी जुळवून घेत असताना ती आपल्या नव्या कुटुंबाशी अर्थपूर्ण नाती निर्माण करते आणि स्वीकार हा सहानुभूती व परस्पर आदरातूनच मिळतो, हे शिकते.

दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले, “वर्षानुवर्षे लोकप्रिय कथांमध्ये सासू-सुनेचं नातं प्रामुख्याने संघर्षाच्या नजरेतून दाखवलं गेलं आहे. या वेब मालिकेत मला सर्वात जास्त उत्साह वाटला तो म्हणजे समजूतदारपणा, सोबत आणि भावनिक प्रगल्भतेवर आधारित एक वेगळी कथा सांगण्याची संधी. ही मालिका आपल्याला सांगते की, कुटुंबातील नाती ही केवळ नात्यांच्या नावावर नव्हे, तर स्वीकार, जिव्हाळा आणि रोजच्या छोट्या क्षणांमधून घडत असतात.”

रेणुका शहाणे म्हणाल्या, “मला अगं आई अहो आई मध्ये सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पडद्यावर क्वचितच पाहायला मिळणारं एक नातं—आई आणि सासू यांच्यातील मैत्री. एक आई म्हणून आपल्या मुलीला तिच्या नव्या आयुष्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आधार मिळावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने दाखवते की मुलगी एक कुटुंब गमावत नाही, तर आणखी एक कुटुंब आणि कदाचित आणखी एक आई मिळवते. या स्त्रियांच्या नात्यातील ऊब, विश्वास आणि परस्पर आदर हीच या मालिकेची खरी ताकद आहे आणि प्रेक्षकांनाही ती नक्कीच जवळची वाटेल”

निर्मिती सावंत म्हणाल्या, “मला अगं आई अहो आई मधील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपासून पाहत आलेल्या साचेबद्ध कथनपद्धतीला ही मालिका छेद देते. सासू-सुनेमधील संघर्ष, वर्चस्व किंवा अहंकार याऐवजी ही मालिका एका प्रेमळ, जिव्हाळ्याच्या नात्याची शक्यता साजरी करते. लग्न म्हणजे मुलीने एक कुटुंब गमावणं नव्हे, तर तिला आणखी एक आई मिळणं, हा विचार अतिशय सुंदरपणे मांडला आहे.”

हृता दुर्गुळे म्हणाली, “या कथेकडे मला सर्वप्रथम आकर्षित केलं ते तिच्या प्रामाणिकपणाने आणि आजच्या काळाशी असलेल्या जवळिकीने. माझी व्यक्तिरेखा लग्नानंतर अनेक तरुणींप्रमाणेच आशा, भीती आणि अनेक प्रश्न घेऊन नव्या कुटुंबात प्रवेश करते. पण नेहमीच्या साच्यातील कथा न सांगता, तिचा प्रवास हा आधार, मैत्री आणि आपलेपण शोधण्याचा आहे. विशेषतः तिच्या सासूसोबत निर्माण होणारं सुंदर नातं आणि तिचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *