
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ ही नेहमीच प्रेक्षकांच्या आयुष्यातील वास्तवाशी जोडलेले विषय आपल्या कथानकातून मांडत आली आहे. यावेळीही मालिका, विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही जवळचा वाटणारा शिक्षण व्यवस्था आणि त्यामधील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा विषय हाताळणार आहे. या कथानकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मालिकेत एका दमदार नव्या पात्राची एन्ट्री होणार असून, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता शशांक केतकर ‘रितेश सरपोतदार’ ही प्रभावी भूमिका साकारणार आहे.

या नव्या भूमिकेविषयी बोलताना शशांक केतकर म्हणाला ,”सर्वप्रथम झी मराठीवर पुन्हा परतताना मला खूप आनंद होत आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘कमळी’ सारख्या मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. मला साकारायला मिळणारे ‘रितेश सरपोतदार’ हे पात्र खूप वेगळं आणि अनेक छटा असलेलं आहे. महाविद्यालय, शिक्षण, विद्यार्थी आणि पालक हे विषय माझ्या कायमच जवळचे राहिले आहेत. आजच्या काळात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहणारी मानसिकता वाढताना दिसते. अशा लोकांसाठी विद्यार्थ्यांची स्वप्नं, पालकांचे कष्ट, त्यांचे पैसे किंवा भावना यांना काहीच किंमत नसते. ‘पैसे द्या आणि यश मिळवा’ हीच त्यांची विचारसरणी असते. रितेश सरपोतदार असाच एक महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी माणूस आहे.

पण एक अभिनेता म्हणून मला त्याचा फक्त नकारात्मक पैलू साकारायचा नाही, तर तो असा का बनला, त्यामागची कारणं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा देखील दाखवायच्या आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी कमळीची प्रामाणिकता, अभ्यासू वृत्ती आणि सचोटी पाहिली आहे. याच गुणांच्या बळावर ती अशा प्रभावशाली आणि स्वार्थी व्यक्तीला कसा सामना देते, हीच या पुढच्या प्रवासाची खरी मजा असेल. या वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे.”

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
