पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५०हून अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता तर शेकडोजण जखमी झाले होते. याच दुर्घटनेवर आधारित काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता “एक होतं माळीण” या चित्रपटातून येत्या २४ जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा भव्य सेट आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली,आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. एक संपूर्ण गावच त्या सकाळी नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. उत्तम संहिता, दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि संगीत ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. विशेष म्हणजे राजू राणे यांनी या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन कथानक लिहिलं आहे. हा चित्रपट २४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
