दहशतवादाविरुद्धचे थरारनाट्य

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी ३०० किलो आरडीएक्स पैकी १०० किलो आरडीएक्स वापरलं गेलं, तर २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे?, याचा शोध ‘मुंबई मिशन’मधून उलगडणार आहे. सत्यघटनेवर प्रेरित होऊन हा काल्पनिक सिनेमा बनविण्यात आला आहे. मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसांनंतरची थरारक सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणारा एक नवाकोरा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. आरडीएक्सचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेली जीवघेणी मोहीम आणि त्यामागचा संघर्ष या पोस्टरमधून प्रकर्षाने दिसून येत आहे.

या सिनेमाचे अधिकृत पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरारनाट्य १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे. चित्रपटाबाबत दिग्दर्शक विसपुते म्हणाले, “मुंबईच्या इतिहासातील तो काळ आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. सत्यघटनेवर प्रेरित होऊन ‘मिशन मुंबई’ च्या माध्यमातून आम्ही त्या शोध मोहिमेतील धाडस आणि पोलीस दलाचे योगदान काल्पनिकदृष्ट्या पडद्यावर मांडत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *