‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

रितेश देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजीपर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या, पण अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक पैलू नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेता- लेखक रितेश विलासराव देशमुख, तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख आणि संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते.

एका साध्या आणि संघर्षमय सुरुवातीपासून ते एका अजिंक्य योद्धा-राजाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवर केंद्रित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि पॅन-इंडिया स्तरावर उभा राहणाऱ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात असून, त्याची व्यापकता, नेत्रदीपक दृश्यरचना, थरारक ॲक्शन आणि उच्च दर्जाची तांत्रिक मांडणी यामुळे तो आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या चित्रपटात हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.

‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभर मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वाभिमान आणि प्रेरणादायी जीवनप्रवास भव्य आणि नेत्रदीपक पद्धतीने मोठ्या पडद्यावर साकारला जाणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *