‘हू’ज युवर गायनॅक?’ ही लोकप्रिय कॉमेडी-ड्रामा मालिका आता नव्या सीझनसह ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर परतत आहे. या नव्या सीझनमध्ये डॉ. विदुषी कोठारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अनेक वर्षांपासून ज्या आयुष्याचे स्वप्न ती पाहत होती, त्या नव्या टप्प्याकडे तिची वाटचाल सुरू होताना दिसणार आहे. या मालिकेत सबा आझाद पुन्हा प्रमुख भूमिकेत दिसणार असून, करिश्मा सिंह आणि आरॉन अर्जुन कौल यांच्यासह ही कथा जिथे थांबली होती, तिथूनच पुढे सरकणार आहे. हिमाली शाह दिग्दर्शित हा नवा सीझन २२ मेपासून प्रदर्शित होतोय. यात कुणाल ठाकूर, विभा छिब्बर आणि श्रुती सेठ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दुसऱ्या सीझनमध्ये दैनंदिन कामकाज सांभाळणे, भाड्याची जुळवाजुळव करणे आणि स्वतःच्या मनातील असुरक्षित भावनांशी शांतपणे सामना करणे अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये विदुषी अडकलेली दिसते. अशा वेळी तिचे रुग्ण आणि तिचे मित्र स्वरा (करिश्मा सिंह) आणि मेहर (आरॉन अर्जुन कौल) तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. पहिल्या सीझनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या त्याच आपुलकी, प्रेम आणि जिद्दीने विदुषी पुन्हा एकदा सर्वांसाठी उभी राहताना दिसणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सबा आझाद म्हणाली, “दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा विदुषीच्या भूमिकेत परतणे म्हणजे घरी परतल्यासारखे वाटले. फक्त यावेळी ते घर म्हणजे तिचे स्वतःचे क्लिनिक आहे! या सीझनमधील मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे स्वतःविषयी वाटणाऱ्या शंका आणि आपल्या आजुबाजूच्या लोकांना सगळे काही आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते, अशी सतत मनात राहणारी भावना अत्यंत वास्तव पद्धतीने दाखवण्यात आली आहे.”
दिग्दर्शिका हिमाली शाह म्हणाली, “दुसऱ्या सीझनमुळे आम्हाला विदुषीसमोर येणाऱ्या वैद्यकीय प्रकरणांबरोबरच प्रत्येक पात्राच्या भावविश्वात अधिक खोलवर जाण्याची संधी मिळाली. या सीझनमधील प्रत्येक पात्राचा प्रवास अधिक जवळचा आणि अनेक स्तर उलगडणारा वाटतो, कारण प्रत्येकजण आयुष्यातील बदलांना सामोरे जात आहे. या सीझनमध्ये प्रत्येक पात्राला स्वतःचा क्षण मिळतो आणि एकत्रित कलाकारांनी ही कथा ज्या प्रकारे साकारली आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.”
‘हू’ज युवर गायनॅक?’ सीझन 2 हा 22 मेपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत पाहता येणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
