रंगभूमीवर कलाकारांचे ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय त्या पूर्णत्वास जात नाहीत. पण काही माणसे मात्र याला अपवाद असतात. कुठलाही शिक्का न घेता ती यशस्वी झालेली दिसतात. या आणि अशाच काही गोष्टींवर प्रकाश टाकणारे ‘शिक्कामोर्तब’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवर येत आहे.

सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे व अनिशा सबनीस हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभ शुक्रवार, १२ जून रोजी होणार आहे.

या नाटकाच्या निमित्ताने सागर कारंडे व भक्ती रत्नपारखी यांची जोडी रंगभूमीवर जुळलेली पाहायला मिळणार आहे. दोन दांपत्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या नाटकात असून, विनोदी ढंगाने पण बरेच काही सांगून जाणारे हे नाटक आहे.

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले आहे. विनोद जाधव यांनी लेखन सहाय्य केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. अभिजीत पेंढारकर यांचे संगीत व वलय मुळगुंद यांची गीते या नाटकाला लाभली आहेत. चंदर यांनी रंगभूषा व दर्शना चौधरी यांनी या नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

सध्या या नाटकाच्या तालमी मोठ्या उत्साहात सुरू असून, या नाटकाविषयीची उत्सुकता वाढली आहे. आता कोण कोणावर नक्की शिक्कामोर्तब करणार, याचा उलगडा १२ जून रोजीच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *