महाभारतातील महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणून ओळख असलेला ‘अश्वत्थामा’ आता नाट्यरूपात रंगभूमीवर अवतरला आहे. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या नाटकाच्या माध्यमातून ही व्यक्तिरेखा आता रंगमंचावर आली आहे. प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, दिग्दर्शक व अभिनेते अशोक समेळ यांच्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या संपूर्ण भारतभर गाजलेल्या कादंबरीवर ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे नाटक आधारित आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे. नाटकाचे प्रोजेक्टर नेपथ्य विश्वास पिंपळे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. नाटकाला संग्राम समेळ यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अशोक समेळ व धनश्री दामले या नाटकात भूमिका साकारत आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षी अशोक समेळ या नाटकात अश्वत्थाम्याची भूमिका साकारत आहेत.

महाभारतातील ‘अश्वत्थामा’ या महत्त्वाच्या पात्राने अनेक वाचक व रसिकांना भूल घातली आहे. त्याचे चिरंजीवित्व हा अभ्यासाचा व उत्सुकतेचा विषय आहे. अश्वत्थामा कोण होता, त्याचा तो नीलमणी कसा होता; अशा अगदी साध्या प्रश्नांपासून ते द्रोणाचार्यांचा हा पुत्र नेमका चुकलाच कसा; असे विचार करायला लावणारे अनेक प्रश्न ‘अश्वत्थामा’ या एका शब्दापाशी अडकून पडतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अश्वत्थाम्याचा या कलियुगात शोध घेणाऱ्या आणि त्याच्याविषयी कुतुहूल असणाऱ्या प्रत्येकासाठी हे नाटक म्हणजे मोठी पर्वणी ठरत आहे. या नाटकाच्या माध्यमातून, अश्वत्थाम्याबद्दल आजही कुतुहूल असणाऱ्या रसिकांच्या हाती बरेच काही लागेल, असा विश्वास या नाटकाच्या टीमकडून व्यक्त केला जात आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
