जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी, असा विचार आता निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘जोडीचा मामला’ हे असंच एक नाटक. नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत.
या नाटकाच्या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. नवे कलाकार रंगभूमीवर येण्याने नाटकांमधून नवी ऊर्जा पाहायला मिळेल, त्यामुळे नव्यांचं येणं मराठी नाटक व्यवसायासाठी चांगलंच आहे, असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.
सध्याच्या तरुणाईचा आत्मकेंद्रित विचार, बदलती सामाजिक मानसिकता आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम यावर उपरोधिक पण तितकंच भावनिक भाष्य करणारा हा रंगमंचीय प्रयोग प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक म्हणजे नातेसंबंध, प्रतिष्ठा आणि वास्तव यांची भन्नाट विनोदी कसरत आहे.

‘आजच्या तरुण पिढीचे विचार, त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबातील बदलती समीकरणं यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना व्यासपीठ देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल’, असा विश्वास निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर म्हणाले ‘जोडीचा मामला’ हे नाटक करताना आम्ही विनोदाच्या माध्यमातून आजच्या समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना कुठे ना कुठे स्वतःशी जोडून घेईल. मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येक वयोगटाला भावेल’.
‘जोडीचा मामला’ नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखक आणि संगीतकार चैतन्य कुलकर्णी असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयस इंदापूरकर यांनी सांभाळली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. तसेच अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजाने नाटकातील गाण्यांना विशेष रंग चढला आहे. रंगभूषा उलेश कंधारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
