काळानुसार बदलणारी आजी..

असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात. ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी असतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायला देखील मागं पुढे पाहत नाहीत. याच धाग्यावर नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवी मालिका कलर्स मराठीवर दाखल होतेय.

नुकताच या मालिकेचा प्रोमो आलाय. या प्रोमोमधील मोठं आकर्षण ठरतंय ते ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या ‘बाई-आजी’ या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनच त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो.

अत्यंत गोड, सोज्वळ आणि प्रत्येकाचं मन जिंकून घेणारी छवीची भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. शांभवी (अमृता फडके), वत्सला (वंदना वाकनीस), अनिकेत (संचीत चौधरी), साकेत (अमित रेखी) आणि बेबी आत्या (दिशा दानडे) हे यादेखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत. “मी जिंकून घेईन सारं” ही नवी मलिका १६ मार्चपासून संध्या. ७ वाजता सुरू होतेय.

भारती आचरेकर या मालिकेविषयी म्हणाल्या, ‘बाई-आजी’ ही केवळ परंपरागत चौकटीतली आजी नाही, तर उदारमतवादी, मोकळ्या विचारांची आजी आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी कायम हसतमुख व आनंदी असते. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी अशी ती स्त्री आहे. तरीही घराचा कणा असलेली, संकटांनी तावूनसुलाखून निघालेली पण कधीही न ढासळणारी ही बाई-आजी’ नातवंडांसाठी खंबीरपणे उभी आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करतेय. त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्सुकतेचा टप्पा आहे. ‘बाई-आजी’सारखं बहुपेडी, ताकदीचं आणि भावनिक छटा असलेलं पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *